सुटी लागली की आठवतो मामाचा गाव
मौजमजा करायला असते आमची तिथे धाव
शहरापासून दूर राहतो मामा लांब
छोटसं खेडगाव वसलं तिथं छान
हिरवीगार शेतं छोटी मातीची घरं
सारं सुख तिथं आहे भरलेलं खरं
एसी नाही कुठं आहे वडाचा पार
झोका घेतांना मस्त वाटते गारेगार
नाही कम्प्युटर तरी आहे मित्रांचा मेळा
नदीकाठी वा गल्लीत मनसोक्त खेळा
गाई-म्हशी, गुरं खाण्याची नाही वाण
ठेचा-भाकर रानात लागते पिज्जाहून छान
म्हातारी माझी आजी सांगते जुन्या कथा
कार्टूनपेक्षाही मजा येते ऐकुन घेताघेता
रानातल्या वांग्याची चव किती गोड
आठवणीत राहते ती आंब्याची फोड
काजु, चिंचा, बोरं गोड फणसाचे गरे
खुणावत राहतात मक्याचे ते तुरे
सोलत बसावी उसाची मस्त पेरं
विटी-दांडू त्याचा मग होतो बरोबरं
मामाच्या गावाची असते नेहमी ओढ
स्वर्गाची सफरीने दिली त्याला तोड