« आई मला शिकव »
आई मला शिकव
भाजी कशी करतात
वांग्याच्या भाजीला
मसाला कसा भरतात
जेवणाला तुझ्या हातच्या
आहे फार गोडी
बाबाही घेतात आणखी
भाजी मागून थोडी
पनीर-टीका खातो
आम्ही बोटे चाखून
मटण, मशरूम ठेवतेस
माझ्यासाठी राखून
पोळ्या कश्या होतात
मस्त नरम-नरम
खायला मजा येते
त्या गरम-गरम
कारल्याची भाजीही
लागत नाही कडू
चिंच, गुळ घालून
कि करते तू जादू
मऊ गरम भात
आणि आमटीचं सार
मधे मधे प्यायला
येते मजा फार
हात तुझा चालतो
जसं आहे इंजन
पाहुण्यांसाठी बनवते
किती सारे व्यंजन
चिरून, धुवून भाज्या
ठेवते तू आधीच
मला नाही सांगत
का बरं कधीच
तडका आणि शिरा
शिकव मला आधी
मदत तुला करायची
सांगते मला आजी
उगीच तुला सारे
म्हणतात का गं सुगरण
चल मला शिकव
स्वयंपाकचं व्याकरण