Thursday, 12 July 2018

बेडूकराव

(बालकविता)

« बेडूकराव »


एक होते बेडूकराव
करत होते डराव-डराव

सोबत त्यांच्या पिल्लांची फौज

मग काय पावसात मौजच मौज

मुलांनी सोडल्या पाण्यात होड्या

पळापळ त्यांची मग झाली गड्या

आला जवळ बेडूक मोठा फार

शाम झाला मग भितीने गार

ढगांचा आवाज चित्र-विचित्र

पळायला लागले सारे मित्र

बेडकाच्या अंगावर पडला पाय

शामला लागली नुसती धाय

बेडूक बिचारा पळाला दूर

शामने मग ठोकली धूम


• रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे 
  मो. 8805791905

 ऑक्टोबर २०१८ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित 


शब्दरसिकचा जून-जुलै अंक: bit.ly/Rasik-June-July18

Thursday, 28 June 2018

पाऊस

« पाऊस »


सर सर सर सर आली
भर भर भर धरा ओली

चिंब चिंब चिंब झाले सारे
गार गार गार झोंबे वारे

गड गड गड वाजे नभ
तड तड तड वाजे बघ

चम चम चम करे विज
शांत बरे बाळा निज

धोधो धोधो पाऊस धारा
मधेच पडती शुभ्र गारा

धम धम धम काळी रात्र
पाऊसच पडतो हा सर्वत्र

• रघुनाथ सोनटक्के
   तळेगाव दाभाडे, पुणे
   मो. 8805791905

२२ जुलै २०१८ च्या दै. लोकसत्ता मधे प्रकाशित
 ७ जुलै २०१८ च्या दै. विदभ मतदार मधे प्रकाशित 
Loksatta - Raghunath Sontakke


Tuesday, 26 June 2018

पाऊस (अभंग)

« पाऊस »

आला हा पाऊस
सुसाटला वारा
आनंदला सारा
आसमंत

होड्या कागदाच्या
पाण्यात सोडूया
मस्त बागडूया
पावसात

शितल या सरी
घेवु अंगावरी
सोडू या घागरी
अंगणात

गरम ती भजी
पांघरू दुलई
बघुया थुईथुई 
खिडकीत

शाळेला आरंभ
मस्ती आता बंद
लावुया छंद
अभ्यासाचा

• रघुनाथ सोनटक्के

   तळेगाव दाभाडे

   मो. 8805791905

दि. २६ जून २०१८ च्या दै. कार्यारंभमधे प्रकाशित  
दि. ३ जुलै २०१८ च्या सायबर क्राईम मधे प्रकाशित
दि.८ जुलै आणि १५ जुलै २०१८ च्या दै. दिव्य-मराठी मध्ये प्रकाशित 

Tuesday, 15 May 2018

मामाचा गाव

« मामाच‍ा गाव »

Calligraphy by Raghunath Sontakke

सुटी लागली की आठवतो मामाच‍ा गाव
मौजमजा करायला असते आमची तिथे धाव

     शहरापासून दूर राहतो मामा लांब
     छोटसं खेडगाव वसलं तिथं छान

हिरवीगार शेतं छोटी मातीची घरं
सारं सुख तिथं आहे भरलेलं खरं

     एसी नाही कुठं आहे वडाचा पार
     झोका घेतांना मस्त वाटते गारेगार

नाही कम्प्युटर तरी आहे मित्रांचा मेळा
नदीकाठी वा गल्लीत मनसोक्त खेळा
   
  गाई-म्हशी, गुरं खाण्याची नाही वाण
     ठेचा-भाकर रानात लागते पिज्जाहून छान

म्हातारी माझी आजी सांगते जुन्या कथा
कार्टूनपेक्षाही मजा येते ऐकुन घेताघेता

     रानातल्या वांग्याची चव किती गोड
     आठवणीत राहते ती आंब्याची फोड

काजु, चिंचा, बोरं गोड फणसाचे गरे
खुणावत राहतात मक्याचे ते तुरे

    सोलत बसावी उसाची मस्त पेरं
    विटी-दांडू त्याचा मग होतो बरोबरं

मामाच्या गावाची असते नेहमी ओढ
स्वर्गाची सफरीने दिली त्याला तोड
   • रघुनाथ सोनटक्के
      तळेगाव दाभाडे, पुणे
      मो. 8805791905

दै. दिव्य-मराठी १६ मे २०१८ औरंगाबाद, सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक, जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, अकोला, अमरावती आवृत्ती

Monday, 7 May 2018

रविवार

« रविवार »
Calligraphy by Raghunath Sontakke

शाळेला सुट्टी
नाही घाई फार
आवडतो मला
छान रविवार
     सकाळी अंघोळ
     मस्त उशिरा
     खायला मग देते
     आई मला शिरा
मस्त गरम-गरम
पास्ता, सुप प्यावे
कार्टून बघतांना
मित्रांशी हसावे
     मित्रांशी खेळतांना
     जाते निघून दुपार
     लपाछपीमधे मी
     अाहे खुप हूशार
सांयकाळी बागेत
खेळ खुप खेळावे
घसरगुंडी, झोपाळा
अन् चेंडूमागे पळावे
     रंगीत हाॅटेलात मस्त
     गरम खावा पिज्जा
     रविवार मला आवडतो
     कारण असते खुप मज्जा
• रघुनाथ सोनटक्के
    मो. 8805791905

६ मे  २०१८ च्या दै. 'दिव्य-मराठी' (सोलापूर, उस्मानाबाद, जालना, बीड जिल्हा आवृत्ती) या दैनिकात प्रकाशित

१३ ऑक्टोबर २०१८, पुण्यनगरी (विदर्भ आवृत्ती) मध्ये प्रकाशित 

                           Raghunath Sontakke        Raghunath Sontakke





Thursday, 12 April 2018

आमचे सर

आमचे सर

*आमचे सर*

छोट्या-छोट्या गोष्टी
सांगतात रंगवुन छान
सुरेख अन् सरळ असतो
काढलेला त्यांनी बाण

गणितही सुलभ होतं
त्यांची पद्धत आहे सोपी
चुकल्यावर मग कुणाला
मिळत नाही माफी

पृथ्वीचा गोल असतो
रेखीव अन् सुंदर
नकाशा जगाचा मावतो
बरोबर त्याच्या अंदर

गाणी अन् कविता
असतात त्यांना तोंडपाठ
सोपा करून देतात 
सारा सारा गृहपाठ

इंग्रजीची शिकवणी
नाही पडत गरज
समजायला,बोलायला
प्रत्येकजणच सरस

खेळाच्या मैदानी देतात
डावपेच अन् धडे
कबड्डीच्या खेळातही 
नसते कुणी आमच्यापुढे

शिकवणं त्यांचं असं की
सार्‍यांनांच कळावे
असे मनमिळावु सर
सार्‍यांनांच मिळावे !
• रघुनाथ सोनटक्के
   मो. 8805791905

दै.  दिव्य मराठीत (उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, भुसावळ जिल्हा आवृत्ती) १२ एप्रिल २०१८ ला प्रकाशित), ८ सप्टेंबर २०१८ च्या दै. युवा छत्रपती मधे प्रकाशित )
३ मे २०१९ दै. केसरी, बालकुंज मधे प्रकाशित

Wednesday, 21 February 2018

चव

« चव »

आंबट खाऊन
धरेल तुमचा घसा
खोकतांना मग
रडाल ढसाढसा

गोड गुलाबजाम
खाऊ नका फार
     खाजवत राहावे लागेल
नको तिथे फार

तिखटानं तुमचं
पोळेल तोंड अन् वाणी
जाऊन दहावेळा 
भरावं लागेल पाणी

खारटही ज्यादा






बिघडवुन टाकेन चव
प्रसादाएवढं पुरे
खातो जेवढं देव
• रघुनाथ सोनटक्के
   मो. 8805791905
(दि. २२ फेब २०१८ ला दिव्य-मराठीच्या अकोला अमरावती, औरंगाबाद, उस्मानाबाद, नाशिक आवृत्तीत प्रकाशित बालकविता)
२ मार्च २०१९ च्या दै. पुण्यनगरी (विदर्भ आवृत्ती) ला प्रकाशित 
Raghunath Sontakke Raghunath Sontakke

Wednesday, 10 January 2018

फुल फुल फुलपाखरा

« फुल फुल फुलपाखरा »



फुल फुल फुलपाखरा 
उडतोस कसा भराभरा 

पंखावर लेवुन छान छान रंग 

शोषतो फुलांचा गोड मकरंद 

पंख तुझे जशी विमानाची पाती 

झोपतोस कुठं रं काळ्याभोर राती 

गातोस रं गाणं तु किती हळूहळू 

चल आमच्यासोबत थोडा झोकाही खेळू 

बागंच आहे तुझं सारं सारं काही 

सोबत घे उडायला थोडं आम्हालाही 

नाही परिक्षा तुला अन् नाही शाळा 

करशील का आमचा अभ्यास थोडा 

जाऊ नकोस लांब ऐकुन घे जरा 

उडतोस कुठं असा दूर भराभरा 

फुल फुल फुलपाखरा 

उडतोस कसा भराभरा 
 • रघुनाथ सोनटक्के 
   तळेगाव दाभाडे, पुणे 
   8805791905
दै. दिव्यमराठी नाशिक, धुळे, उस्मानाबाद (दि. २४ डिसेंबर २०१७) आवृत्तीत प्रकाशित

Tuesday, 19 December 2017

फुलपाखरू

« फुलपाखरू »
Butterfly Raghunath Sontakke's Poem
रंगबिरंगी पंख
विहरण्यात दंग
पिते मकरंद
फुलपाखरू

छोटंसं गाणं
इवलासा प्राण
जगते छान
फुलपाखरू

जगण्याची हमी
आहे जरी कमी
जगते आनंदानी
फुलपाखरू

पंखावर रंग
फुलांचा संग
नाजूक अंग 
फुलपाखरू
• रघुनाथ सोनटक्के

२ फेब्रुवारीच्या दै.दिव्य-मराठी जवळपास सर्वच आवृत्तीत (अहमदनगर, उस्मानाबाद,  नाशिक, जळगाव, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बुलडाणा) प्रकाशित बालकविता
Butterfly - Raghunath Sontakke's Poem

Wednesday, 4 October 2017

भाज्या घेवु

« भाज्या घेवु »
चल गं आजी, बाजाराला जाऊ
ताज्या अन् हिरव्या, भाज्या घेवु

वड्यासाठी हवा मला, मोठासा आलु
भजी अाणि भाजीसाठी, चकत्या छिलु

लाल-लाल टोमॅटोचं, भारी होईल सुप
प्यायला आम्हाला, आवडतंय खुप

वांग्याचं भरीत, भरलेली वांगी
स्वस्त अन् केव्हाही, नाही हंगामी

कडू, हिरवी कारली, गुणी आहेत फार
नाही-नाही करत, खातो फोडी चार

पालक-मेथी, शेपु-चुका डब्याला
कोथंबिर वापरावी, स्वाद आणि चवीला

पनीरसोबत पालक, भजी त्याची चवदार
कडवट मेथीची, भाजी आवडे थोडीफार

कोबी, फुलवरचे, प्रवासात खावे पराठे
हलकेफुलके जेवणच ते, आम्हा हवे वाटे

लांबसर भेंडीची, चिकट होईल भाजी
लिंबु पिळ म्हणुन थोडं, सांगते आजी

चव आणि तंदुरूस्तीला, खाव्या ताज्या
भरून पिशवी, घेतल्या मी भाज्या

• रघुनाथ सोनटक्के
   मो. 8805791905

(पाणिनी मासिकात प्रकाशित)