Sunday, 26 July 2020

भाज्यांची मजा

भाज्यांची मज्जा
उघडानागडा आलू म्हणे
बघा मी आहे किती गोरा
काळे वांगे रूसलेले मग
बघत त्याचा असला तोरा

भेंडी चालत होती सरळ
हिरवी, हिरवी मस्त भारी
कापायला ती खूपच चिकट
देतेस त्रास उगीच तरी

दुधी भोपळा फुगला बघा
चालत तिरका तिरका
माझ्याविणा सांबर म्हणजे
काही चवच नाही बरं का!

भोपळा लाल किती गोड!
घार्‍या माझ्या हो करा
नाहीतर खुशालपणे मज
विळ्याने चरचरा चिरा

मिरची झाली तिखट भारी
पळेल आता तोंडचे पाणी
अद्दल घडवेन म्हणे अन्
याद राखाल मला तुम्ही

गाजरासंगे काकडी म्हणे
कोशींबिर मस्त माझी करा
कच्चे खायला येईल मज्जा
दोघांना सोबतच हो चिरा

कोबी,फ्लावर दोघी बहिणी
वेगळ्या आहेत थोड्या फार
एक घालते थोडेच कपडे
अन् दुसरी नेसते बुवा फार!

टमाटा गालात हळूच हसला
म्हणे रंग माझा चमकदार
मिसळतो मी सगळ्यांमधे
करा भाजी मस्त चटकदार
• रघुनाथ सोनटक्के
  मो. ८८०५७९१९०५

Wednesday, 15 July 2020

पाऊस

पाऊस
वारा सुटला भर भर भर
ढग फिरतो घर घर घर

थेंबाचे गाणे टप टप टप
सरीमागे सर रप रप रप

मातीला वास घम घम घम
वीजही चमके चम चम चम

कौलारातून धब धब धब
डबकी भरली डब डब डब

बेडूक करे डर डर डराव
चिपचिपचा होईल सराव

पाऊस बरसे टिप टिप टिप
दिवस रात्र ही रिप रिप रिप

होड्या सोडा वर वर वर
तरंगत जाती भर भर भर
•  रघुनाथ सोनटक्के, पुणे
   मो. ८८०५७९१९०५
१६ जुलै २०२०, दै. आदर्श महाराष्ट्र
१४, १६ जुलै २०२०, दै. युतीचक्र