Thursday, 27 December 2018

बगळा

« बगळा »



पांढरा शुभ्र बगळा
लावतो मस्त ध्यान
पाण्यात लक्ष ठेवून
दाखवतो हा शान 

एक पाय दुमडून
राहतोय उभा
भोळसर माशांना
देतोय दगा

कोयत्यासम वाकडी
आहे त्याची मान
पाणथळ ठिकाणी
त्याचे वस्तीस्थान

घाबरतात त्याला
बेडकं लहान
पळतात कशी
वाचवत प्राण

पिवळी-धम्म चोच
बाकी शुभ्र सगळा
नदीकाठी दिसतो
असा हा बगळा 
• रघुनाथ सोनटक्के

२५ डिसेंबर २०१८ च्या साप्ताहिक सायबर क्राईम तसेच २८ डिसेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 
२ जानेवारी २०१९ च्या दै. कार्यारंभ मधे प्रकाशित (http://karyarambh.com/beed/20190102/1/5/beed.html)
६ जानेवारी २०१९ च्या दै. महाराष्ट्र टाईम्स (संवाद) मधे प्रकाशित

Raghunath SontakkeRaghunath Sontakke 

Sunday, 23 December 2018

क्रिकेट

« क्रिकेट »

चला रे चला बाळू आणि अमित 
क्रिकेट खेळूया मैदानभूमीत

उचल त्या दांड्या आणि तो बॉल
बाकी जणांना करा आता कॉल 

काहीजण राहा थोड्या अंतराने उभे 
आम्ही तर आहोत मधोमध दोघे

चल टाक बॉल दाखव तू पॉवर 
सहा चेंडूची मोज एक ओव्हर



हे घे षटकार पळा मागे सारे 
अंगार घुसले माझ्या विराटचे वारे

जिंकायला शतक, काढू जादा रन
पार्टी करू शेवटी मग सारे जण 

खेळा आता तुम्ही टाकतो आम्ही गोल
एका एकाला मग करतो क्लीन बोल्ड

क्रिकेट आहे आमचा आवडता खेळ
मित्र मंडळींचा मग जमतो बघा मेळ

गेला चेंडू उंच बाळू घे कॅच 
हरवून तुम्हाला संपली ही मॅच 

• रघुनाथ सोनटक्के
२२ डिसेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्रमधे तसेच २५ डिसेंबर २०१८ च्या दै. कार्यारंभ मधे प्रकाशित 
Raghunath Sontakke

Wednesday, 12 December 2018

मासा

 « मासा »

मासा रे मासा 
पाणी तुझे घर
भीतो तू यायला 
पाण्याच्या वर

अंघोळीची तुला 
पडते का रे गरज 
कि नाही साबण 
तुझ्याकडे खरंच 

पोहायला तुला 
आहेत लवचिक पर 
अलगद तरंगतो 
मस्त पाण्यावर 

कधी मारतो खोल
जाऊन तू सूर 
मग असो नदीला 
मोठा महापूर 

श्वास घ्यायला तुला
आहेत दोन कल्ले 
हलवत राहतो 
शेपटीचे वल्हे

अंगावर तुझ्या  
आहेत रेशमी खवले 
सटकतो हातातून 
जर पकडून ठेवले 

रंग, आकार तुझे
आहेत किती फार 
खाण्यासाठी तुझे किती 
बनवतात प्रकार  

माणसांनी तुलापण 
दिल्या किती जाती 
येईन भेटायला तुला 
मी रोज नदीकाठी

• रघुनाथ सोनटक्के

१२ डिसेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 
१९ डिसेंबर २०१८ च्या दै. 'कार्यारंभ'मधे प्रकाशित
२ फेब्रुवारी २०१९ च्या दै. 'दिव्य-मराठी'मधे प्रकाशित
  

Monday, 3 December 2018

पतंग

« पतंग »

चला रे उडवू
पतंग आकाशी
जाईल दूर दूर 
उंच ढगापाशी

दूर दूर उडवा
पडेल बघा पीळ
लक्ष द्या बाजुला
सांभाळून रिळ

ढिल नका देऊ
खाईल मग गोता
सावरणे कठीण 
खाली येता येता

जाईन का रे तो
ढगांच्याही मागे
पुरतील का त्यासाठी
एवढेसे धागे 

जाता येईल का वर
पतंगाला धरून
पाहात येईल मग
जग सारे वरून
  • रघुनाथ सोनटक्के

१० डिसेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 
१४ जानेवारी २०१९ च्या विदर्भ मतदार मधे प्रकाशित 
१४ जानेवारी २०१९ च्या विदर्भ मतदार मधे प्रकाशित
११ मे २०१९ दै. केसरी, बालकुंज मधे प्रकाशित
Raghunath Sontakke
 Raghunath Sontakke Raghunath Sontakke