Wednesday, 13 September 2017

फुले

« फुले »
निळी, पिवळी, शुभ्र, लाल
मला आवडतात फुले फार

गुलाबाचा गंध, फारच गोड
वेणीत माळते दीदी रोज

कमळाचा बघा, वेगळाच थाट
तळ्यात पसरली खचुन दाट

चंपा-चमेली, प्राजक्त-लिली ताजी
दत्ताच्या फोटोला हार घाली आजी

प्रसन्न दरवळ, फुलतो मोगरा
आणतात पप्पा आईला गजरा

लालभडक लोबंतो जास्वंद फांदीवर
शोभुन दिसतो गणपतीच्या सोंडीवर

पिवळ्या धम्मक झेंडूचा मंगल हार
गुढी, दसरा-दिवाळीला सजवु दार

सुदंर, सुगंधी, रंगीत फुले
गोड, गोंडस आम्ही मुले

फुले-Raghunath Sontakke
• रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव, पुणे
  8805791905



दैनिक सामनाच्या 'उत्सव' पुरवणीत प्रकाशित

Wednesday, 23 August 2017

गणुदेव

« गणुदेव »



मला आवडतो गणुदेव फार
त्याच्या आगमनाची आतुरता अपार

रोज त्याच्यासाठी आणतो मी हार
आवडतात दुर्वा त्याला हिरव्यागार

आई बनविते लाडू अन् मोदक
आरतीसाठी घाई करतो मी रोजच

घर होतं मंगल पाहून तुझं रुप
बाप्पा तुझी सोंड आहे छान खुप

येतो वाजतगाजत होतो हर्षभर
वाट बघत असतो आम्ही वर्षभर

• रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव, पुणे,  8805791905

८ सप्टेंबर २०२४ च्या दै. लोकसत्ता (लोकरंग) पुणे मधे प्रकाशित 







२५ सप्टेंबर २०१८ च्या दै. युवा छत्रपती 
५ सप्टेंबर २०१८ च्या दै. पथदर्शी 
१८ सप्टेंबर २०१८ च्या सायबर क्राईममधे प्रकाशित 


Wednesday, 14 June 2017

शाळेला जाऊ

 शाळेला जाऊ 

सुटी संपली पाऊस आला
शाळेला आता जाऊ चला

बाबा मला आणा बुट आणि ड्रेस
आवडतो मला शाळेचा गणवेश

पाटी दप्तर पाठीवर ओझी
त्रास देई आईला घाई माझी

शाळेला जाण्याची झाली मला घाई
बुकं आणि डबा भरून दे ना आई

लवकर मला शाळेत गं जायचे
मित्रांना मला आज जाऊन भेटायचे
शाळेतुन सुटल्यावर जाईन मी घरी
आई मला देईन छान छान खारी
• रघुनाथ सोनटक्के
8805791905

(दै. दिव्य-मराठीत प्रकाशित)

Tuesday, 12 April 2016

मनी म्याव


मनी म्याव

मनी म्याव मनी म्याव 
दिसते कशी छान 
लांब लांब मिश्या तुझ्या 
छोटे छोटे कान 

उंदराची वाट कशी 
बघते दबा धरून 
दुध पिते चुटचुट
डोळे बंद करून 

बोकोबा बाई तुझे 
रागीट गं भारी 
आले की ते तु 
जाते मागच्या दारी 

वाघाची तु मावशी 
आमची गं मनी 
लाड तुझे भारी 
करतो साऱ्याजणी 

बोल गडे तु 
सांग तुझे नाव 
आहे का बाई तुझे 
नाव मनी म्याव  

● रघुनाथ  सोनटक्के

दै. 'दिव्य मराठी' (23-May-2017)

Friday, 1 April 2016

वर्षाराणी

वर्षाराणी
सुसाट पळतो वारा 
गाणे गातो पानोपानी 
मासुंडल रान सारं 
आली आली वर्षाराणी 

पक्षी जाती घरट्याकडे 
गुरे धावती पायदानी 
गाऊ लागे कोकीळ 
होईल आता आबादानी 

लपे अनिल ढगांशी 
मेघांची लपाछपी चाले 
माथ्यावर इंद्रधनूची 
सप्तरंगी उधळण खुळे 

टपटपती थेंब टपोरे 
बरसती कधी धारा 
वर्षा तुझ्या आगमनाने 
बहरला आसमंत सारा 

बरसल्या तुझ्या राणी 
सारीमागून सरी 
हिरव्या शालुने सजली 
अवनी नववधूपरी 

सजली फुलांनी झाडे 
हिरवी हिरवी पाती 
येईल पुन्हा वर्षाराणी 
पक्षी गाणे गाती 

 रघुनाथ सोनटक्के 
8805791905
दैनिक सामनाच्या 'उत्सव' या रविवारीय पुरवणीत माझी प्रकाशित बालकविता

Wednesday, 30 March 2016

प्राण्यांची निवडणूक

प्राण्यांची निवडणूक 

रानात होती एकदा प्रमुखाची निवडणुक 
सर्व लागले कामाला कचरा केला साफसुफ 

लगेच भरली तिथे भलीमोठी सभा 
वाघोबा झाला अध्यक्ष पोपट होता उभा 

चिन्हासाठी झाला वाद वाघोबाचं होतं काय म्हणणं 
पुर्वीपासून पकड माझी पंजाच माझं चिन्हं 

हत्तीदादा झाले उभे म्हणे पाडतो मी भुरळ 
तलावाकाठी माझे राज्य द्यावे मला कमळ 

माकड म्हणे मला बरं झाड भेटले छान गड्या 
धुमाकूळ घातला त्यानं मारून फार उड्या 

कोल्हा होता अपक्ष खाल्ली त्याने मते 
लागत होते मागे त्याच्या मोठे-मोठे नेते 

प्रचाराला निघाले सकाळी पांढरे फसवे बगळे 
आश्वासन देऊन त्यांनी आपले केले सगळे 

ससे, हरणे सारे देत होते मते 
वाघ-कोल्हे एक-एकच फस्त करत होते 

 - रघुनाथ सोनटक्के 

(दै. दिव्य-मराठीत प्रकाशित)

Friday, 25 March 2016

गोगलगाय

गोगलगाय 

गोगलगाय गोगलगाय 
चालतेस हळू हळू 
थकत का नाहीस 
शंख ओढू ओढू

भारी होत असेल नाही 
तुला शंखाचे ओझे 
थांबत थांबत चालत जा 
दुखतील पाय तुझे 

चक्षु लांब करून 
बघत जा पुढे 
धोका असेल तर 
थांबत जा थोडे 

हात लावला कि तुला 
लाजतेस तू भारी 
ओढून घेते आत तुझी 
काय गोरी गोरी 

बागेत जाऊ आपण 
लपाछपी खेळू 
रोड झालीस बाई 
शंख ओढू ओढू 

नाव तुझं ठेवलं कुणी 
छान गोगलगाय 
तुझी माझी जोडी 
सांग जमेल काय 
रघुनाथ सोनटक्के 
8805791905

(दै. दिव्य-मराठीत प्रकाशित)




Friday, 19 February 2016

खारूताई

खारू ताई

खारी गं खारी
येशील का घरी
वाट पाहिन तुझी
मी झाडाखाली



खोडावरून उतरतेस
खाली भरभर
घेऊन जा मला
तुझ्या पाठिवर


मुंग्या, अळ्या
खातेस तु चवीनं
सावलीत छान छान
दिलं घर देवानं

         - रघुनाथ सोनटक्के
        8805791905
(पाणिनी मासिकाच्या सप्टेंबर २०१७ अंकात प्रकाशित)

Tuesday, 9 February 2016

सकाळ

सकाळ

  घराशेजारचा कोंबडा
देतो पहाटे बाग
आईची धामधुम

येतो मला जाग
 
पुर्वेला उगवतो सुर्य
आकाशाच्या कपाळी
मंदिरात वाजे घंटा
ऐकू येई भूपाळी


पक्षांची किलबिल
चाले रानोमाळी
कोकीळ लावे सुर
गातो राघू सकाळी 

तुळशीला वाहे पाणी
आई माझी भोळी
मांगल्य असे घरात
दारी सडा, रांगोळी

घाली मला अंघोळ
देई आई थाळी
खाऊ खाण्यासाठी
उठतो मी सकाळी

- रघुनाथ सोनटक्के

(दै. सामना 'उत्सव' पुरवणीत  प्रकाशित)

Sunday, 31 January 2016

चिऊताई

चिऊताईवर बालकविता, आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

चिऊताई


येगं येगं चिऊताई अंगणात माझ्या
दाणे ने टिपून बाळाला तुझ्या

खाऊन घे काही काही चोचीत भर
येईल कुणी बाई चल घाई कर

इथे बघ, तिथे बघ सांडलेले दाणे
चिवचिव करत गाणे गा थोडे

घरट्यामध्ये तुझी पिल्ले हाका मारत असतील
चिऊ आई करत वाट बघत असतील

झाडाला टांगले मडके पाणी पीत जा
पिल्लांना तुझ्या दाणे नेत जा

येताजाता इथे गाणे गात जा
रोज माझ्या घरी अशीच येत जा


- रघुनाथ सोनटक्के