Thursday 27 December 2018

बगळा

« बगळा »



पांढरा शुभ्र बगळा
लावतो मस्त ध्यान
पाण्यात लक्ष ठेवून
दाखवतो हा शान 

एक पाय दुमडून
राहतोय उभा
भोळसर माशांना
देतोय दगा

कोयत्यासम वाकडी
आहे त्याची मान
पाणथळ ठिकाणी
त्याचे वस्तीस्थान

घाबरतात त्याला
बेडकं लहान
पळतात कशी
वाचवत प्राण

पिवळी-धम्म चोच
बाकी शुभ्र सगळा
नदीकाठी दिसतो
असा हा बगळा 
• रघुनाथ सोनटक्के

२५ डिसेंबर २०१८ च्या साप्ताहिक सायबर क्राईम तसेच २८ डिसेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 
२ जानेवारी २०१९ च्या दै. कार्यारंभ मधे प्रकाशित (http://karyarambh.com/beed/20190102/1/5/beed.html)
६ जानेवारी २०१९ च्या दै. महाराष्ट्र टाईम्स (संवाद) मधे प्रकाशित

Raghunath SontakkeRaghunath Sontakke 

Sunday 23 December 2018

क्रिकेट

« क्रिकेट »

चला रे चला बाळू आणि अमित 
क्रिकेट खेळूया मैदानभूमीत

उचल त्या दांड्या आणि तो बॉल
बाकी जणांना करा आता कॉल 

काहीजण राहा थोड्या अंतराने उभे 
आम्ही तर आहोत मधोमध दोघे

चल टाक बॉल दाखव तू पॉवर 
सहा चेंडूची मोज एक ओव्हर



हे घे षटकार पळा मागे सारे 
अंगार घुसले माझ्या विराटचे वारे

जिंकायला शतक, काढू जादा रन
पार्टी करू शेवटी मग सारे जण 

खेळा आता तुम्ही टाकतो आम्ही गोल
एका एकाला मग करतो क्लीन बोल्ड

क्रिकेट आहे आमचा आवडता खेळ
मित्र मंडळींचा मग जमतो बघा मेळ

गेला चेंडू उंच बाळू घे कॅच 
हरवून तुम्हाला संपली ही मॅच 

• रघुनाथ सोनटक्के
२२ डिसेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्रमधे तसेच २५ डिसेंबर २०१८ च्या दै. कार्यारंभ मधे प्रकाशित 
Raghunath Sontakke

Wednesday 12 December 2018

मासा

 « मासा »

मासा रे मासा 
पाणी तुझे घर
भीतो तू यायला 
पाण्याच्या वर

अंघोळीची तुला 
पडते का रे गरज 
कि नाही साबण 
तुझ्याकडे खरंच 

पोहायला तुला 
आहेत लवचिक पर 
अलगद तरंगतो 
मस्त पाण्यावर 

कधी मारतो खोल
जाऊन तू सूर 
मग असो नदीला 
मोठा महापूर 

श्वास घ्यायला तुला
आहेत दोन कल्ले 
हलवत राहतो 
शेपटीचे वल्हे

अंगावर तुझ्या  
आहेत रेशमी खवले 
सटकतो हातातून 
जर पकडून ठेवले 

रंग, आकार तुझे
आहेत किती फार 
खाण्यासाठी तुझे किती 
बनवतात प्रकार  

माणसांनी तुलापण 
दिल्या किती जाती 
येईन भेटायला तुला 
मी रोज नदीकाठी

• रघुनाथ सोनटक्के

१२ डिसेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 
१९ डिसेंबर २०१८ च्या दै. 'कार्यारंभ'मधे प्रकाशित
२ फेब्रुवारी २०१९ च्या दै. 'दिव्य-मराठी'मधे प्रकाशित
  

Monday 3 December 2018

पतंग

« पतंग »

चला रे उडवू
पतंग आकाशी
जाईल दूर दूर 
उंच ढगापाशी

दूर दूर उडवा
पडेल बघा पीळ
लक्ष द्या बाजुला
सांभाळून रिळ

ढिल नका देऊ
खाईल मग गोता
सावरणे कठीण 
खाली येता येता

जाईन का रे तो
ढगांच्याही मागे
पुरतील का त्यासाठी
एवढेसे धागे 

जाता येईल का वर
पतंगाला धरून
पाहात येईल मग
जग सारे वरून
  • रघुनाथ सोनटक्के

१० डिसेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 
१४ जानेवारी २०१९ च्या विदर्भ मतदार मधे प्रकाशित 
१४ जानेवारी २०१९ च्या विदर्भ मतदार मधे प्रकाशित
११ मे २०१९ दै. केसरी, बालकुंज मधे प्रकाशित
Raghunath Sontakke
 Raghunath Sontakke Raghunath Sontakke


Thursday 22 November 2018

आला हिवाळा




बालकविता

« आला हिवाळा »

आला हिवाळा
शेकोटी पेटवा
कचरा जाळून
गारवा हटवा

अंगात स्वेटर
कानाला मफलर
पायात बुटाच्या
मोजे अंदर

थोडावेळ सकाळी
उन्हात बसा
कुडकुडत मस्त
चहा ढोसा

थंडीत दिसतो
शेकोटीचा धूर
दवामधे दिसेना
माणूस दूर

लाडू, फराळ
सकाळी गटवा
हिवाळ्यात थंडी



अशी ही हटवा

• रघुनाथ सोनटक्के

दै. पुण्यनगरी (विदर्भ आवृत्ती) १५ डिसेंबर २०१८ आणि १२ जानेवारी २०१९
दै. डहाणू मित्र मधे २३ नोव्हेंबर २०१८ ला प्रकाशित 
दै. पथदर्शी मधे २४ नोव्हेंबर २०१८ ला प्रकाशित 
दै. कार्यारंभ मधे ३० नोव्हेंबर २०१८ ला प्रकाशित 



Thursday 1 November 2018

दिवाळी

दिवाळी

आली सगळ्यांची
आवडती दिवाळी
शाळेलाही सुटी
आनंदाच्या यावेळी

आई कर चिवडा 
शेव अन् मिठाई
करंजीसोबत लाडू
गोड बालूशाई

कुरकुरीत बनव
गोड शंकरपाळी
पक्वान्नाने भरेल
दिवाळीची थाळी

सगळ्यांना कपडे
आणा सुंदर नवे
शेरवाणी, जीन्स
ताई अन् मला हवे

फटाके फुलझड्या 
धमाधम वाजवू 
आकाशकंदीलाने 
घराला हो सजवू

करूया साजरा हा
दिवाळी सण
सगळ्यांना मिळू दे
खायला पण

• रघुनाथ सोनटक्के

५ नोव्हेंबर २०१८ (दै. पथदर्शी मधे प्रकाशित ) 
६ नोव्हेंबर २०१८ (दै. साप्ताहिक सायबर क्राईममधे प्रकाशित ) 

 

Friday 28 September 2018

मुलगा मुलगी

« मुलगा मुलगी »




मिटवून टाका भेद आता
मुलीला समजू नका परकं
दोन्ही घरी लावते दिवा
तिलाही वागवा मुलासारखं

ति करेल तुमचं नाव

गर्वही वाटेल तुम्हाला
समाजाच्या प्रगतीसाठी
लावेल खांदा तुमच्या खाद्याला

मुलगी होईल राष्ट्रपती

कधी होईन पोलीस
दुष्टांशी लढण्याची हिंमत
मिळू द्या मुलीस

तोडून टाक आता 
बंधनाच्या साऱ्या बेड्या 
का तिला रोखतो असे 
भल्या माणसा वेड्या 


• रघुनाथ सोनटक्के

      मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB

२९ सप्टेंबर २०१८ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित व २ ऑक्टोबर २०१८ च्या सायबर क्राईममध्ये प्रकाशित 

Sunday 9 September 2018

पोळा

बालकविता
   « पोळा »
Calligraphy by Raghunath Sontakke

   

बैलराजाचा आला सण पोळा
चला मित्रांनो होऊया गोळा

आजोबा माझे करतात शेती
बैलांच्यासंगे पिकवतात माेती

जू नका देवू त्यांच्या खांद्यावर
रंगीत मऊ झुल घालू अंगावर

धूवा चोळून रंगवा तासलेली शिंगे
तलवारी कापाया उभ्या डोईसंगे

शिंगाना रंग, पायात लावू तोड
खाऊ घालू ठोंबरा थोडा गोड

गळ्यामधे घालूया घुंगूर माळा
माथ्या लाव आई गंधाचा टीळा

देवू नका त्यांना कसलंही काम
आजच्या दिसाला ठेवू त्यांचा मान

दारामधे सगळ्यांच्या थोडसं थांबू
पुजा करताना बोलू हर हर शंभू


  • रघुनाथ सोनटक्के
     तळेग‍ाव दाभाडे, पुणे

     मो. ८८०५७९१९०५

११ सप्टेंबर २०१८ च्या दै. युवा छत्रपतीमधे प्रकाशित | १३ सप्टेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 

 

Thursday 30 August 2018

ऋतू

« ऋतू »



वर्षाचे मोजून
आहेत महिने बारा
निसर्ग रूप कसे
बदलतो भराभरा

पावसात पडतो 
पाऊस धबा धबा
सारेजण बसतात
घरात धरून दबा

कुणाकडे रंगीत छत्री
कुणी घालतो रेनकोट
फिरायला जाऊन दूर
चालवे कुणी पाणबोट

सकाळी उठायला
येई जाम कंटाळा
कुडकुडत जावे शाळेत
गारेगार हिवाळा

अंगात घाला सुती
जाडजुड स्वेटर
अंघोळीच्या पाण्यासाठी 
चालू करा हिटर

शाळेला सुटी मग
आला गरम उन्हाळा
मामाच्या गावी मजा 
करायला चला पळा

उन्हाळ्यात सार्‍यांची
अंगाची लाहीलाही
थंडगार सरबत, पन्हं
गार करे जीभेलाही

वर्षामागून वर्षे बघा
जातात असे निघून
आपण होतो मोठे
ऋतु राहतात टिकून

• रघुनाथ सोनटक्के

२५ नोव्हेंबर २०१८ च्या दै. लोकसत्ता मधे प्रकाशित
१० मे २०१९ च्या दै. केसरी, बालकुंज मधे प्रकाशित

 30 ऑगस्ट २०१८ च्या दै. मातृभूमी (अकोला) मधे प्रकाशित
30 ऑगस्ट २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 
Raghunath Sontakke





Monday 27 August 2018

चिमणीचं घरटं

« चिमणीचं घरटं »

एका चिमणीला बांधायचं होतं घरटं
बाळ यायला अजून वेळ होता तुर्त

गवताच्या कांड्या केल्या तिने गोळा
शोधूनही आणला कापसाचा बोळा

घरात शोधली तिने मस्त छोटी खोबणी
चिवचिवत करे ती धाग्यादोर्‍याची मागणी

मजा यायची आम्हाला तिची लगबग पाहून
चिमनाही करायचा मदत अधूनमधून जावून

काही दिवसांनी दिली तिने अंडी
चोरून बघायचो घालत थोडी मुंडी

एका सकाळी आली चिवचीव ऐकायला
मग आम्हा लागली छोटी पिल्लं दिसायला

गेली त्यांची आई आणायाला चारा
ओरडून संपवला त्यांनी दिवस सारा

आवाज केला की लगेच ती जागायची
चुंबकासारखी ताणून मान वर खेचायची

खाऊ भेटला की शांत गार निजायची
आई जायची बाहेर 'चिवचिव' भजायची

हळूहळू पिल्लं व्हायला लागली मोठी
पंखाने घ्यायची झेप सोडवून मिठी

सांभाळ त्यांचा करे चिमणी जीवापाड
हळूहळू होऊ लागली मग त्यांची वाढ

मोठी झाल्यावर पिल्लं गेली लांब दूर उडून
चिमणीने दुःखाने टाकला खोपा मोडून



• रघुनाथ सोनटक्के

  तळेगाव दाभाडे, पुणे

  मो. 8805791905

११ सप्टेंबर २०१८ च्या सायबर क्राईम  मधे प्रकाशित 

Thursday 23 August 2018

ढग

« ढग »
Calligraphy by Raghunath Sontakke

आई मला सांग
कुठून येतात ढग?
खुप सारे आकार
कसे घेतात मग!

कुठून आणतात ते
भरून गार पाणी
गडगड करून काय
गात असतील गाणी!

उन्हाळ्यात आले की
पडते मस्त छाया
बगळ्यासारखी शुभ्र
असते त्यांची काया

रात्रीच्या वेळेला शांत
बसती मुग गिळून
चांदाेमामाही बघतो
मला त्यांच्या आडून

आकाशाची मला
करायची गं स्वारी
परीला शोधायला
बसून त्यांच्यावरी

वाढदिवसाला माझ्या
आण त्यांना घरी
फुगवायला फुगे मग
मदत होईल भारी

• रघुनाथ सोनटक्के
   तळेगाव दाभाडे, पुणे
   मो. 8805791905

१६ सप्टेंबर २०१८ च्या दै. महाराष्ट्र टाईम्स मधे प्रकाशित 


२४ ऑगस्ट २०१८ च्या दै. कार्यारंभमधे प्रकाशित 
दि. ३० ऑगस्ट २०१८ च्या सायबर क्राईम मधे प्रकाशित
Dainik Karyarambha

Raghunath Sontakke




Thursday 2 August 2018

झाडे लावुया

बा • ल • क • वि • ता
  « झाडे लावुया »

 Calligraphy by Raghunath Sontakke


तोडू नका झाडे
बस झाली हानी
झाडे लावली तरच
येईल पाऊसपाणी

झाडे देतात छाया
फळे त्यांची गोड
धरतीला वाचवण्या
थांबवा वृक्षतोड

पावसाळ्यात चला
झाडे लावू खुप
उन्हाळ्यात धरेची
कमी होईल धुप

झाडे देतात चारा
खायला गोड अन्न
दिसली कि सावली
वाटते कसं प्रसन्न

लावू खुप झाडे
हिरवी करू धरा
रोखुन प्रदूषण
स्वच्छ घेवू वारा


• रघुनाथ सोनटक्के
   तळेगाव दाभाडे, पुणे

   मो. 8805791905

९ सप्टेंबर २०१८ च्या दै. सामना उत्सव पुरवणीत प्रकाशित 


Raghunath Sontakke


७ ऑगस्ट २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 
Dahanu Mitra - Raghunath Sontakke


  

Thursday 12 July 2018

आमचे पाळीव

(बालकविता)

« आमचे पाळीव »

टप टप करत चालतो घोडा
ऐट आणि वेगाचा आहे जोडा

पिंजर्‍यात विठूची बोलायची गोडी
आवडतात त्याला डाळींब फोडी

भल्या पहाटे देतो कोंबडा बांग
लौकर उठायला सगळ्यांना सांग

घर, शेताचा कोण राखणदार
खंड्या आमचा आहे दक्ष फार

मनीची कामगिरी आहे भारी
उंदरांना कमी पडे भुई सारी

मुलांना दूध-लोणी देते गाय
शेतीत बैल तिचा राबतो हाय

बोकडाच्या मटनाला मस्त भाव
शक्ती मिळवा मारून ताव

काळीभोर म्हैस दूधाची धार
घट्टपांढरे दही आवडे फार

खुराड्यात लागे कोंबड्यांची झुंज
रोज मिळते आम्हाला शुभ्र अंडं


•  रघुनाथ सोनटक्के
   तळेगाव दाभाडे, पुणे
   मो. 8805791905
२७ डिसेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 
Raghunath Sontakke