Wednesday, 8 January 2020

खोकला



चिंच, बोरं खाऊन
आला मला खोकला
आजीच्या सांगण्याने
दवाखाना गाठला

हळदीचे दुध आणि
आल्याचा चहा
दिवसातून दोनवेळा
म्हणे प्यायला हवा

दही खायला बंदी
नको आंबट फळे
वाढेल मग ढास
आणखी त्याच्यामुळे

चाॅकलेट्स झाली बंद
आईस्क्रीम मिळेना
साधंसरळ जेवन
मला मग गिळेना

आजी म्हणे आईला
छान लक्ष दोघं ठेवा
कोमट पाण्याचा शेक
याला द्यायला हवा

खाऊ नका थंडीचे
आंबट आणि गार
खोकल्याने नाकी नऊ
आणले मला फार

सिरप, गोळ्या देऊन
डाॅक्टरही दमला
आजीच्या नुस्क्यानी
खोकला मग थांबला
रघुनाथ सोनटक्के
 
८ जाने २०२० च्या साप्ताहिक सायबर क्राईम मधे प्रकाशित. 
१५ मे २०२०, दै. युतीचक्र आणि आदर्श महाराष्ट्र  

 

Thursday, 26 December 2019

नाताळ

नाताळ
जिंगलबेल जिंगलबेल
आलाय सांताक्लाज
गिफ्ट देतो सगळ्यांना
मौज करू सारे आज

लाललाल टोपी त्याची
पांढरी दाढी, झब्बा
खांद्यावर पोतडी घेत
हाती चाॅकलेट डब्बा

चाॅकलेट सारे पाहून
सुटला माझा ताबा
हसतखेळत देतोय
सांताक्लाज बाबा

ख्रिसमस ट्री चमके
वाट पाहूया सगळे
नविन वर्ष येईल
आनंद घेऊन वेगळे

येसू जन्मला रात्री
दिवे लाऊया आज
जिंगलबेल जिंगलबेल
आलाय सांताक्लाज
• रघुनाथ सोनटक्के

दै. दिव्य मराठी (२५ डिसेंबर २०१९)  प्रीतीसंगम (२४ डिसेंबर २०१९) मधे प्रकाशित


रानफुल

रानफुल

पिवळं पिवळं
एक फुल फुललं
पहाटे सुर्यासंग
हळू बोललं

आपण पिवळे
मैत्री करू दोघे
सांग बरं तुझं
कसं चाललं?

फुलपाखरू एक
उडतउडत आलं
तुही रंगीत गड्या
छान जमलं!

थोड्या वेळाने
आली धुंद हवा
म्हणे चल खेळू
तिला बोललं!

सुर्य गेला मावळून
थोडं मलूल झालं
थकुनभागुन हळूच
झोपी चाललं!
• रघुनाथ सोनटक्के

साप्ताहिक सायबर क्राईम (२४ डिसेंबर २०१९) मधे प्रकाशित
२९ डिसेंबर २०१९ च्या  विदर्भ मतदारमधे प्रकाशित 
 
 

Friday, 6 December 2019

थंडी

थंडी
कुड कुड कुड
वाजे बघा थंडी
स्वेटर, टोपरं नी
घाला जाड बंडी

सकाळी सकाळी
धुक्याची चादर
शाळेला जायला
ऊठवते मदर

गरम शेकोटी
जाई धुर वर
आजोबा बसूया
चला लवकर

हात-पाय, डोके
पडले गार गार
उन्ह वाटे गोड
खावे फार फार

खारीक, लाडूंचा
खावुया खुराक
थंडीला पळवू
एकाच दमात

रघुनाथ सोनटक्के


दै. युवा छत्रपतीमधे प्रकाशित
८ डिसेंबर २०१९ च्या मटा, झिपझैपझूम मधे प्रकाशित
 २९ डिसेंबर २०१९ च्या लोकसत्ता, बालमैफल मधे प्रकाशित




 

Tuesday, 10 September 2019

गणेशाचे आगमन

गणेशाचे आगमन

रूप त्याचे सुंदर
सोंड लांब सुरेख
आमच्या घरी आला
छोटा श्रीगणेश

मोदकांचे ताट
हाती हवे त्याला
ऐटीमधे बसून
चालवे मुषकाला

रोषनाई करून
सजवू त्याचे आसन
विद्येचा तो धनी
पाहून आम्हा हसण

सुखकर्ता-दुखहर्ता
सारेजण बोला
हाती त्याच्या शोभे
दुर्वा आणि भाला

तो आला घरी
असते आमची चंगळ
लाडका गणूदेव
आहे छान मंगल


• रघुनाथ सोनटक्के


दै. युवा छत्रपतीमधे प्रकाशित.  

https://youtu.be/b0jgqqHUg7U

Friday, 9 August 2019

सरीवर सरी


« सरसर सरी »
काळे काळे ढग, आले हो दाटून
बरसेल धो-धो, आभाळ फाटून

सरसर पडे, पावसाची सर
चिंबचिंब भिजे, सगळ्यांचं घर

गडगड ढग, तडतड विज
भूईच्या आतमधे, उगवेल बीज

टपटप थेंब, पावसाचे वाजती
पक्षाची चिवचिव, मोरही नाचती

सात रंगाने, नटले कसे अंबर
इंद्रधनू तो, दिसे बघा सुंदर

शाळेच्या अंगणी साचलं पाणी
भिजत गाऊ पावसाची गाणी

• रघुनाथ सोनटक्के

 १० सप्टेंबर २०१९ दै. दिव्य मराठीला प्रकाशित.  
Raghunath Sontakke
 

Tuesday, 30 July 2019

माकडाचं सलून

 « माकडाचं सलून »

माकडानं टाकलं
मस्त एक सलून
बोर्ड लाव
ला दराचं
आपलं नाव घालून

सगळ्यांना घाई
कुणी घेई मसाज
दाढी-कटींगचा दर
ठेवला रूपे पचास

अस्वल आले रांगत
म्हणे कापून दे केस
मालिश कर माझी
वाटेल मला फ्रेश

माकड मात्र त्याचे
केस कापून थकले
वाकून वाकून कमरेचे
हाड पुर्ण वाकले

फेशियल करायला
आला एक कावळा
फरक पडेना क्रिमने
लावून किती वेळा!

पिवळ्या अंगावर
पट्टे काळे काळे
घाबरतच केली वाघाची
मालिश बळे बळे

सिंहाला करायची होती
डाय आयाळीची
सवय होती त्याला
लाळ गाळायाची

कोल्हा आला मग
धावत हापतांना
वास ये
तोंडाचा
केस कापतांना

हत्ती घुसला दुकानात
हळूच पाय घालून
बसता-बसता त्याने
टाकले दुकान तोडून

माकडाच्या दुका
नाचा
प्रयत्न परत फसला
फुकट करून दाढी
कोल्हा गालात हसला

• रघुनाथ सोनटक्के


३० जूलै २०१९ दै. दिव्य मराठीमधे प्रकाशित
किशोरच्या जानेवारी २०१९ अंकात प्रकाशित

Saturday, 27 July 2019

वाघोबा

वाघोबा


डरकाळी फोडली कि
होतात सारे गार
वाघोबांना सगळेच
प्राणी भीतात फार

पिवळ्या अंगावर
पट्टे काळे काळे
घाबरतच पळतात
सारे खडे खडे

वाघोबाची मिशी
बारीक पिळदार
दातांचे सुळेपण
दोन अणुकूचीदार

सारेच त्याच्यापुढे
घोळतात गोंडा
हरिण असो कि
मग हत्ती वा गेंडा

• रघुनाथ सोनटक्के
मो. ८८०५७९१९०५
२७ जूलै २०१९ दै. युवा छत्रपतीत, शब्दरसिक पानावर प्रकाशित
४ ऑगस्ट २०१९ च्या दै. लोकसत्ता, लोकरंग पुरवणी, बालमैफलमध्ये प्रकाशित.
Raghunath Sontakke
 

Monday, 13 May 2019

स्वप्नात माझ्या

बालकविता

स्वप्नात माझ्या
स्वप्नात मी गेलो
आकाशातल्या घरी
तिथे भेटली मला
मैत्रिण माझी परी

चाॅकलेट, गोळ्यांचा
पाऊस तिथे पडायचा
आईस्क्रिमचा ढग
पांढराशुभ्र मिळायचा

कुल्फीच्या जंगलात
दिसेना कुठे धूप
पिझ्झाच्या फुलांतून
झरे चिज खुप

सायकल ना घोडा
उडत होतो हवेत
फिरवत होती परी
मला घेऊन कवेत

शुभ्र खडूचांदण्या
काळ्या नभाची पाटी
चंद्राची येई गाडी
मला फिरवायासाठी

छोटा भीम, डोरा
सगळेच तिथे हजर
करावी थोडी मस्ती
तर वाजला मग गजर

आईने दिली हाक
उठा शाळेला चला
स्वप्नातल्या दुनियेत
जायला आवडते मला 
• रघुनाथ सोनटक्के
११ मे २०१९ दै. युवा छत्रपती मधे प्रकाशित बालकविता.
१२ मे २०१९ दै. डहाणू मित्रमधे प्रकाशित
Raghunath SontakkeRaghunath Sontakke

Saturday, 20 April 2019

सरबताची शाळा

« सरबताची शाळा »

एकदा भरली सरबताची शाळा
उशीरा येतो म्हणे सुगंधी वाळा

लिंबू म्हणाले मी आंबट फार
सरबत बनवा मस्त गारे गार

कापून मधे मला जरा पिळा
नंतर पाण्यात साखर सोडा

कोकम म्हणाले भरा लाल ग्लास
पाहूण्यांना तुमच्या द्या खा खास

सोलकढीताई बोले थोडी चव चाखा
वाटलं तर म्हणे थोडा मसाला टाका

मधेच बोलली ती शांत, थंड निरा
निघून जाईल तुमचा थकवा सारा

सर्वांना आवडतो मी मसाला ताक
जीर्‍या-मिठाची मला सोबत झ्याक

नारळपाण्याची असे ऐटच भारी
छाटून डोके अन् घुसवा नळी

सुट्यांमधे जर बसल्या उन्हाच्या झळा
भेट द्या आम्हाला हव्या तेवढ्या वेळा
• रघुनाथ सोनटक्के
मो. ८८०५७९१९०५ 

२० एप्रिल २०१९ दै. पुण्यनगरी
दै. लोकसत्ता, बालमैफल मधे प्रकाशित
 १७ एप्रिल २०२०, आदर्श महाराष्ट्र 
Raghunath Sontakke