Saturday, 30 March 2019

आंबे

बालकविता

« आंबे »

फळांचा राजा
कोण आहे सांगा
सर्वांचा आवडता
गोड गोड आंबा

हापूस, केशरी
काही पिकवायला
काहींचा आमरस
काही टिकवायला

हिरव्या-हिरव्या
कैर्‍या तोडा
पन्हं, लोणचं
चटण्या वाढा

गोड, पिवळे
निवडून घ्या
आमरस मस्त
बनवुन प्या

फिकून गेलीय
मामाची वाडी
सुटी घालवूया
मजेत थोडी

चाखून घ्या
गोड गोड फोडी
वर्षाने मिळेल
आंब्य‍ांची गोडी

    • रघुनाथ सोनटक्के
 २ जून २०१९ च्या दै. युवा छत्रपती (शब्दरसिक) मधे प्रकाशित
 ९ जून २०१९ दै. दिव्य-मराठी मधे प्रकाशित
 

Tuesday, 19 March 2019

होळी आली

बालकविता

«  होळी आली »

रंगाची दुनिया लयच भारी
होळी खेळूया मिळून सारी


वेगवेगळे रंग अंगावर टाकू
एकमेकांना चला प्रेमाने माखू


 हिरवा, लाल, पिवळा, करडा
कुणी बनेल बघा रंगीत सरडा


काळ्या रंगाने झाला गेंडा गण्या
चिंधीबाबा दिसतो कपड्यांत जुन्या


पाण्याचा फेकतो रंगीत फुगा 
लपून लावे मला देतोय दगा

होळी खेळायचे कृष्ण अन् राधा
प्रेमाची होतसे साऱ्यांना बाधा


जमा करू कचरा तुटकी लाकडे
झाडांच्या रक्षणास लक्ष तिकडे


सगंळ्यासोबत होळी खेळूया
रंगाने मैत्रीचे नाते जोडूया
 • रघुनाथ सोनटक्के
  २२ मार्च २०१९ च्या दै. मराठवाडा संचार मधे प्रकाशित
Raghunath Sontakke

Monday, 11 February 2019

कोडं (भवरा)

बालकविता

« भवरा »
गिरक्या घेतो
भर भर भर
तोल जाईना
माझा लवकर
      बांधून सोडा
      जोरात शेंडी
      एक पाय अन्
      पोटाची हंडी
पृथ्वीसारखं
करतो मी भ्रमन
थांबून शेवटी 
आहे माझं नमन
       बसतो खिशात
       गप अन् गुमान
       मजा मी देतो  
       किती तुम्हा छान
घातलं तुम्हाला
मजेदार कोंडं
आठवा बरं माझं 
नाव काय थोडं
• रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे

 फेब्रुवारी २०१९ च्या दै. बलशाली भारत मधे प्रकाशित 
Raghunath Sontakke



Wednesday, 16 January 2019

आई मला शिकव

« आई मला शिकव »



आई मला शिकव 
भाजी कशी करतात 
वांग्याच्या भाजीला 
मसाला कसा भरतात 

जेवणाला तुझ्या हातच्या 
आहे फार गोडी 
बाबाही घेतात आणखी 
भाजी मागून थोडी 

पनीर-टीका खातो
आम्ही बोटे चाखून 
मटण, मशरूम ठेवतेस
माझ्यासाठी राखून

पोळ्या कश्या होतात 
मस्त नरम-नरम
खायला मजा येते 
त्या गरम-गरम

कारल्याची भाजीही 
लागत नाही कडू 
चिंच, गुळ घालून
कि करते तू जादू 

मऊ गरम भात 
आणि आमटीचं सार 
मधे मधे प्यायला  
येते मजा फार 

हात तुझा चालतो 
जसं आहे इंजन 
पाहुण्यांसाठी बनवते 
किती सारे व्यंजन 

चिरून, धुवून भाज्या 
ठेवते तू आधीच 
मला नाही सांगत 
का बरं कधीच 

तडका आणि शिरा 
शिकव मला आधी 
मदत तुला करायची 
सांगते मला आजी 

उगीच तुला सारे 
म्हणतात का गं सुगरण 
चल मला शिकव
स्वयंपाकचं व्याकरण

  • रघुनाथ सोनटक्के

१७ जानेवारी २०१९ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 

११ जानेवारी २०१९ च्या दै. बलशाली भारत मधे प्रकाशित 
 Raghunath Sontakke

Thursday, 27 December 2018

बगळा

« बगळा »



पांढरा शुभ्र बगळा
लावतो मस्त ध्यान
पाण्यात लक्ष ठेवून
दाखवतो हा शान 

एक पाय दुमडून
राहतोय उभा
भोळसर माशांना
देतोय दगा

कोयत्यासम वाकडी
आहे त्याची मान
पाणथळ ठिकाणी
त्याचे वस्तीस्थान

घाबरतात त्याला
बेडकं लहान
पळतात कशी
वाचवत प्राण

पिवळी-धम्म चोच
बाकी शुभ्र सगळा
नदीकाठी दिसतो
असा हा बगळा 
• रघुनाथ सोनटक्के

२५ डिसेंबर २०१८ च्या साप्ताहिक सायबर क्राईम तसेच २८ डिसेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 
२ जानेवारी २०१९ च्या दै. कार्यारंभ मधे प्रकाशित (http://karyarambh.com/beed/20190102/1/5/beed.html)
६ जानेवारी २०१९ च्या दै. महाराष्ट्र टाईम्स (संवाद) मधे प्रकाशित

Raghunath SontakkeRaghunath Sontakke 

Sunday, 23 December 2018

क्रिकेट

« क्रिकेट »

चला रे चला बाळू आणि अमित 
क्रिकेट खेळूया मैदानभूमीत

उचल त्या दांड्या आणि तो बॉल
बाकी जणांना करा आता कॉल 

काहीजण राहा थोड्या अंतराने उभे 
आम्ही तर आहोत मधोमध दोघे

चल टाक बॉल दाखव तू पॉवर 
सहा चेंडूची मोज एक ओव्हर



हे घे षटकार पळा मागे सारे 
अंगार घुसले माझ्या विराटचे वारे

जिंकायला शतक, काढू जादा रन
पार्टी करू शेवटी मग सारे जण 

खेळा आता तुम्ही टाकतो आम्ही गोल
एका एकाला मग करतो क्लीन बोल्ड

क्रिकेट आहे आमचा आवडता खेळ
मित्र मंडळींचा मग जमतो बघा मेळ

गेला चेंडू उंच बाळू घे कॅच 
हरवून तुम्हाला संपली ही मॅच 

• रघुनाथ सोनटक्के
२२ डिसेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्रमधे तसेच २५ डिसेंबर २०१८ च्या दै. कार्यारंभ मधे प्रकाशित 
Raghunath Sontakke

Wednesday, 12 December 2018

मासा

 « मासा »

मासा रे मासा 
पाणी तुझे घर
भीतो तू यायला 
पाण्याच्या वर

अंघोळीची तुला 
पडते का रे गरज 
कि नाही साबण 
तुझ्याकडे खरंच 

पोहायला तुला 
आहेत लवचिक पर 
अलगद तरंगतो 
मस्त पाण्यावर 

कधी मारतो खोल
जाऊन तू सूर 
मग असो नदीला 
मोठा महापूर 

श्वास घ्यायला तुला
आहेत दोन कल्ले 
हलवत राहतो 
शेपटीचे वल्हे

अंगावर तुझ्या  
आहेत रेशमी खवले 
सटकतो हातातून 
जर पकडून ठेवले 

रंग, आकार तुझे
आहेत किती फार 
खाण्यासाठी तुझे किती 
बनवतात प्रकार  

माणसांनी तुलापण 
दिल्या किती जाती 
येईन भेटायला तुला 
मी रोज नदीकाठी

• रघुनाथ सोनटक्के

१२ डिसेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 
१९ डिसेंबर २०१८ च्या दै. 'कार्यारंभ'मधे प्रकाशित
२ फेब्रुवारी २०१९ च्या दै. 'दिव्य-मराठी'मधे प्रकाशित
  

Monday, 3 December 2018

पतंग

« पतंग »

चला रे उडवू
पतंग आकाशी
जाईल दूर दूर 
उंच ढगापाशी

दूर दूर उडवा
पडेल बघा पीळ
लक्ष द्या बाजुला
सांभाळून रिळ

ढिल नका देऊ
खाईल मग गोता
सावरणे कठीण 
खाली येता येता

जाईन का रे तो
ढगांच्याही मागे
पुरतील का त्यासाठी
एवढेसे धागे 

जाता येईल का वर
पतंगाला धरून
पाहात येईल मग
जग सारे वरून
  • रघुनाथ सोनटक्के

१० डिसेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 
१४ जानेवारी २०१९ च्या विदर्भ मतदार मधे प्रकाशित 
१४ जानेवारी २०१९ च्या विदर्भ मतदार मधे प्रकाशित
११ मे २०१९ दै. केसरी, बालकुंज मधे प्रकाशित
Raghunath Sontakke
 Raghunath Sontakke Raghunath Sontakke


Thursday, 22 November 2018

आला हिवाळा




बालकविता

« आला हिवाळा »

आला हिवाळा
शेकोटी पेटवा
कचरा जाळून
गारवा हटवा

अंगात स्वेटर
कानाला मफलर
पायात बुटाच्या
मोजे अंदर

थोडावेळ सकाळी
उन्हात बसा
कुडकुडत मस्त
चहा ढोसा

थंडीत दिसतो
शेकोटीचा धूर
दवामधे दिसेना
माणूस दूर

लाडू, फराळ
सकाळी गटवा
हिवाळ्यात थंडी



अशी ही हटवा

• रघुनाथ सोनटक्के

दै. पुण्यनगरी (विदर्भ आवृत्ती) १५ डिसेंबर २०१८ आणि १२ जानेवारी २०१९
दै. डहाणू मित्र मधे २३ नोव्हेंबर २०१८ ला प्रकाशित 
दै. पथदर्शी मधे २४ नोव्हेंबर २०१८ ला प्रकाशित 
दै. कार्यारंभ मधे ३० नोव्हेंबर २०१८ ला प्रकाशित 



Thursday, 1 November 2018

दिवाळी

दिवाळी

आली सगळ्यांची
आवडती दिवाळी
शाळेलाही सुटी
आनंदाच्या यावेळी

आई कर चिवडा 
शेव अन् मिठाई
करंजीसोबत लाडू
गोड बालूशाई

कुरकुरीत बनव
गोड शंकरपाळी
पक्वान्नाने भरेल
दिवाळीची थाळी

सगळ्यांना कपडे
आणा सुंदर नवे
शेरवाणी, जीन्स
ताई अन् मला हवे

फटाके फुलझड्या 
धमाधम वाजवू 
आकाशकंदीलाने 
घराला हो सजवू

करूया साजरा हा
दिवाळी सण
सगळ्यांना मिळू दे
खायला पण

• रघुनाथ सोनटक्के

५ नोव्हेंबर २०१८ (दै. पथदर्शी मधे प्रकाशित ) 
६ नोव्हेंबर २०१८ (दै. साप्ताहिक सायबर क्राईममधे प्रकाशित )